जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
जळगाव (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये ट्रीगर 1 (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उत्पादीत चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 मधील अधिकारांचा वापर करून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चार्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे.
काय आहेत आदेश ?
या आदेशात हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, कोणत्याही प्रकारची पेंढ, टीएमआर व इतर पशुखाद्य यांचा समावेश आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हा आदेश 1 ऑक्टोबर 2026 पासून पुढील ते आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


