दहिगावातील दिव्यांगाला विहिरीत उलटे लटकवले : दोघांना अटक


यावल (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील दहिगाव गावातील 50 वर्षीय दिव्यांगाला विहिरीत 15 मिनिटे उलटे लटकवण्यात आले शिवाय या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. एका पसार साथीदाराचाही शोध सुरू असून या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण
दहिगावातील नामदेव रामदास पाटील (50, पाटील गल्ली, दहिगाव) यांनी या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर न्हावरा रोडलगत वेडू शंकर पाटील यांच्या मालकीची विहिरी आहे व येथे 28 सप्टेंबर रोजी दुपारी दिड ते दोन दरम्यान संशयीत नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (23) व पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (22, दोन्ही रा.दहिगाव) यांनी फिर्यादी नामदेव पाटील यांचे दोन्ही पाय पकडून ठेवत त्यांना सुमारे 15 मिनिटे विहिरीत उलटे लटकवले व त्यानंतर त्यांची अंडरपँट काढून त्याला नग्न करीत चापटांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी दोन्ही संशयीतांचा अनोळखी साथीदार याने विहिरीजवळ उभे राहून मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ तयार केला. फिर्यादीला विहिरीत लटकवून ठेवले असताना त्याचे पाय निसटले असते तर तो विहिरीत पडून जीव गमावू शकला असता, याची जाणीव आरोपींना असतानाही त्यांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे, फिर्यादी दिव्यांग असल्याची माहिती आरोपींना असतानाही केवळ त्याची टिंगलटवाळी करण्यासाठी व त्यास घाबरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले व केलेल्या कृत्याचा व्हिडिओ व्हॉट्सपवर व्हायरल करून फिर्यादीची समाजात बदनामी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दोन आरोपींना अटक, तिसर्‍याचा शोध
या प्रकरणी तक्रारदार नामदेव रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून संशयीत नितीन पाटील व पंकज पाटील यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. तिसरा पसार संशयीतांचा कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !