जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी : कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर चांदसर शिवारात हल्ला
Sand mafia’s tyranny in the district : Revenue team that went for action attacked in Chandsar Shivara जळगाव (19 डिसेंबर 2024) : दबंग वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला केला. धरणगाव तालुक्यातील चांदसर शिवारात हा प्रकार घडला. तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचारी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले.
वाळू माफियांची दादागिरी वाढली
गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठी लिलाव झाला नसल्याने वाळू उपसा करण्यावर बंदी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांना धुडकावून वाळू माफिया रात्री चोरून वाळूची वाहतूक करत आहेत. बांभोरी, निमखेडी, आव्हाणे, चांदसर या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी ही अवैध वाहतूक सुरू आहे.
महसूल पथकावर हल्ला
19 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2.15 वाजता धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु.॥, ता.धरणगाव) येथील गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर नायब तहसीलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक, मालक व वाळू भरणारे मजूर अशा 15 लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला.
तलाठ्यांना जबर मारहाण
तलाठी दत्तात्रय पाटील हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना पावड्याने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पाटील यांच्या पायावर फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी दाखले झाले. वाळू माफियांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी महसूल कर्मचार्यांनी केली आहे.