मुक्ताईनगरात चाकूच्या धाकावर दरोडा : भुसावळातील पाच आरोपींना बेड्या
जळगाव गुन्हे शाखेसह मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी : चाकू, पिस्टलसह दहा हजारांची रोकड जप्त
Robbery at knifepoint in Muktai Nagar: Five accused from Bhusawal arrestedन्यूज नेटवर्क । भुसावळ (24 डिसेंबर 2024) : मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील लक्ष्मी नारायण प्रोव्हीजनजवळ चाकूहल्ला करीत दहा हजारांची रोकड संशयीतांनी लूटली होती. 19 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा होताच मुक्ताईनगर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या आरोपींना अटक
गुन्हे शाखेने सुरूवातीला रेकॉर्डवरील आरोपी प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे (वाल्मीक नगर, भुसावळ) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर संशयीत रोहित उर्फ दादु संजय नवघिरे (वाल्मीक नगर, भुसावळ), रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख (दोन्ही रा.जाम मोहल्ला, भुसावळ), कुंदन अनिल पठाळे (भुसावळ) यांना अटक करण्यात आली.

रोकडसह शस्त्र जप्त
आरोपींच्या अटकेनंतर त्यांच्याकडून लुटीतील दहा हजारांची रोकड, गुन्ह्याच्या वेळी वापरलेला गावठी कट्टा, चार मोबाईल, बुलेट, होंडा दुचाकी जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेंद्र चाटे, एपीआय जयेश पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी तसेच नाईक महेंद्र सुरवाडे, नाईक सुरेश मेढे, कॉन्स्टेबल गोविंदा पवार, सुनील मोरे आदींच्या पथकाने केली.









