रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे : उमेश महाले
भुसावळ (4 जानेवारी 2025) : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक न करता रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी येथे केले. शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात शालेय परिवहन समिती सहविचार सभा शुक्रवार, 3 जानेवारी झाली. यावेळी महाले यांनी वाहतुकीचे नियमांचे रिक्षाचालक तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल घडवण्यासाठी पालन केले पाहिजे, असे आवाहन केले.
शासन नियमानुसार पालक, रिक्षाचालक यांनी कार्य केले पाहिजे व शासनाच्या नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी सलीम शेख, संजय भदाणे उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला पालक यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. उमेश खोडपे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन दीपक तेली यांनी मानले.








