परधाडे रेल्वे अपघात : मुख्यमंत्री म्हणाले, जखमींना सर्वोतोपरी सुविधा
जळगाव (22 जानेवारी 2025) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक बंगरूळू एक्स्प्रेसखाली आल्याने 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता 15 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली होती. या घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, जखमींसाठी सर्वोतोपरी सुविधा
एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी दाखल झाले असून संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत आहे.
जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.