राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा : अजित पवार-शरद पवारांच्या बंद द्वाराआड चर्चेची उत्सुकता
पुणे (23 जानेवारी 2025) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर राज्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले. मात्र काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

दालनात शिरल्याचा व्हिडिओ समोर
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र आले. यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी पीएला विचारले कुठे बसायचे आहे, यावर पीएने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, अजित पवारांच्या आईचा दावा
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची माहिती दिली. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही त्यांनी केला.
