यावल तहसीलला कर्मचारी अनुपस्थित, अस्वच्छतेमुळे आमदार अमोल जावळेंनी घेतली झाडाझडती

यावल तहसीलसह पंचायत समितीतील कर्मचार्‍यांमध्ये उडाली खळबळ


यावल (28 जानेवारी 2025) : आमदार अमोल जावळे यांनी शुक्रवारी यावल तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये जाऊन झाडाझडती घेतली. तहसील कार्यालयात पुरवठा विभागातील गलथान कारभार तसेच पंचायत समितीमध्ये अनुपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी याबाबत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

केवायसीसाठी फेर्‍या मारणार्‍या एका वृद्ध महिलेची केवायसी स्वतःच त्यांनी संगणकावर बसून करून दिली व कर्मचारी साईट बंद आहे ,असे सांगतात मात्र त्यात कितपत तथ्य आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. पंचायत समितीमधल्या अस्वच्छतेबाबत त्यांनी तेथील उपस्थित अधिकार्‍यांची चांगलीच कान उघाडणी केली. अधिकार्‍यांची वरिष्ठांकडे आपण तक्रार करू व हा प्रश्न आपण थेट विधानसभेत मांडू, असेदेखील त्यांनी यावेळी बजावले.


अचानक आमदारांनी दिली भेट
यावल तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या कार्यालयात आमदार अमोल जावळे यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात ई-केवायसीसाठी एक वृद्ध महिलेने दोन वेळा यापूर्वी चकरा मारल्या होत्या मात्र साईट बंद आहे, असे सांगण्यात आले. आमदार जावळे यांनी स्वतः त्या वृद्ध महिलेचा हात धरून त्यांना कार्यालयात नेले व स्वतःच विभागाच्या संगणकावर त्यांनीच बसून संबंधित साईड ओपन केली. त्याचप्रमाणे पुरवठा विभागातदेखील साईड बंद आहे, असे सांगण्यात येत होते. तेथेदेखील त्यांनी स्वतः संगणक हाताळले आणि नवीन नोंदणी होत असल्याचे तेथील कर्मचार्‍यांना दाखवून दिले. कशा पद्धतीने साईट बंद आहे, असे नाव सांगून येथील कर्मचारी नागरिकांची हेळसांड करतात हे पाहून त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

पंचायत समितीत कर्मचारी फैलावर
पंचायत समितीमध्ये आमदार आले त्यावेळी गटविकास अधिकारी नव्हते. सहाय्यक गटविकास अधिकारीदेखील नव्हते. पावणे पाच वाजता कार्यालयात सर्वत्र सामसूम दिसून येताच त्यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे संपर्क साधून येथील कर्मचार्‍यांवर कोणाचे नियंत्रण आहे क?ा असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्वतःच येथील स्वच्छतागृह व इतर विभागात भेट देऊन पाहणी केली असता तेथील प्रचंड अस्वच्छता दिसून आल्याने उपस्थित कक्ष अधिकार्‍यांची चांगलीच कान उघाडणी केली. अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. त्यांनी वरिष्ठांकडे आपण यांची तक्रार करून व हा प्रश्न विधानसभेत मांडू, असेदेखील सांगितले.

पुरवठा विभागाबद्दल प्रचंड अनास्था
पुरवठा विभागात बारा अंकी क्रमांकासाठी अनेक लोक चकरा मारत असून साईड बंद असल्याच्या नावाखाली नागरिकांची येथे पिळवणूक केली जात असल्याचे तक्रारी देखील याप्रसंगी अमोल जावळे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यांनी स्वतः साईट पडताळून पाहिली असता त्यामध्ये नवीन नोंदणी होत असल्याचे सांगितले.

पंचायत समितीच्या कारभारावर प्रचंड संताप
पंचायत समितीच्या विविध विभागात पावणे पाच वाजता सामसूम असल्याचे पाहून आमदारांनी प्रचंड संताप केला तर गटविकास अधिकारी यादेखील येथे नव्हत्या. इतर कक्षात काहीच मोजकेच अधिकारी होते व त्यांना व्यवस्थित उत्तरेदेखील देता नसल्याने आमदारांनी त्यांना फैलावर घेतले. तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बाळू फेगडे, भूषण फेगडे, व्यंकटेश बारी, अनिकेत चोरटे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !