एमआयडीसीतून तीन लाखांच्या इलेक्ट्रिक साहित्याची चोरी : तीन संशयितांना अटक
Theft of electrical equipment worth three lakhs from MIDC : Three suspects arrested जळगाव (11 फेब्रुवारी 2025) : कंपनीत प्रवेश करीत विविध इलेक्ट्रिक वस्तू तसेच रोकड असा सुमारे तीन लाख तीन हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 27 जानेवारी तसेच 6 फेब्रुवारी रोजी एमआयडीसीतील एस. सेक्टरमधील साई प्रेरणा इंडस्ट्रीज येथे घडली. या प्रकरणी रविवार, 9 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासातून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. इतरांचा शोध सुरू आहे.
काय घडले नेमके
सुनील बाबुलाल सोनवणे (वय 48, रा. वाघ नगर व साई प्रेरणा इंडस्ट्रीज) यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या कंपनीत चोरट्याने प्रवेश करीत मुद्देमाल चोरून नेला.

असा गेला मुद्देमाल
60 हजार रु. किमतीच्या तांब्याच्या व अॅल्यूमिनियम वायरिंग, 18 हजार किमतीच्या 18 इलेक्ट्रिक मोटार, 20 हजारांची रोकड, इलेक्ट्रिक हिट कंट्रोलर तसेच प्लॅस्टिकचे हिट कंट्रोलर, तसेच रुपये 30 हजार व 25 हजार किमतीचे इलेक्ट्रॉनिक दोन पॅनल, 30 हजार किमतीचे 15 नग लोखंडी बिम, 30 हजार किमतीचे लोखंडी भरीव स्क्रू बॅरल एकूण आठ नग, 40 हजार किमतीचे दोन गेअर बॉक्स, 20 हजार किमतीचे दोन इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर, 60 हजार किमतीच्या 30 प्लॅस्टिक व्हॅर्जिन दाण्याच्या भरलेल्या बॅगा, असा सुमारे 3 लाख 3 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे तपास करीत आहेत.






