बारावी परीक्षेची माहिती घेण्यासाठी जाणार्‍या उमाळ्यातील तरुणाचा मृत्यू ; मित्र जखमी


जळगाव (11 फेब्रुवारी 2025) : बारावी केंद्राची परीक्षा मंगळवार,11 पासून सुरु होत आहे. 12 वीला असलेल्या मित्रासोबत केंद्राची माहिती घेण्यासाठी जात असताना भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये मोहित संजय मोरे (वय 20) याचा मृत्यू तर सोबतचा गौरव अशोक पाटील (वय 18, दोन्ही रा. उमाळा) हा जखमी झाला. ही घटना सोमवार, 10 रोजी दुपारी तीन वाजेनंतर संभाजीनगर मार्गावरील रमेंड चौफुलीजवळ घडली. गौरव पाटील हा बारावीचा विद्यार्थी आहे.

माहिती घेण्यासाठी जाताना गाठले मृत्यूने
11 पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षा केंद्राची माहिती घेण्यासाठी गौरवसोबत मोहिम मोरे असे दोघे दुचाकीने जळगाव येथे महाविद्यालयात उमाळा येथुन येत होते. एमआयडीसीतून अजिंठा चौफुलीकडे येत असताना भरधाव वेगातील मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील हे दोघे मित्र रस्त्यावर फेकले गेले. मोहित याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. तर गौरव याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली.प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मोहित मोरे याला मृत घोषीत केले.


उमाळा ग्रामस्थ रुग्णालयात
ही वार्ता धडकताच उमाळा येथील ग्रामस्थ,तरुणांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलगा मोहित याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचे वडील संजय मोरे पुत्रशोकात बुडाले. स्नेहीच्या खांद्यावर डोके ठेवत त्यांना रडू कोसळले. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. मात्र मुलाच्या आठवणींनी ते गहिवरुन पुन्हा अश्रु ढाळत होते. यामुळे रुग्णालयातील अनेक महिलांचे डोळे पाणावले. मोहित हा कुटुंबात एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई वडील एक बहिण असा परिवार आहे.

मोहित फॉर्मसीचा विद्यार्थी
मोहित हा फॉर्मसी महाविद्यालयात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील एमआयडीसीत एका मोटार वाहन कंपनीत कामावर आहेत. महाविद्यालयाला सुटी असल्यास तेव्हा मोहित कुटुंबाच्या कामाला हातभार लावत होता. कोणाच्याही मदतीसाठी धावून जाण्याचा मोहित याचा स्वभाव होता. उमाळा येथील असंख्य तरुणांनी या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त केली.

गौरव खाजगी हॉस्पिटलमध्ये
गौरव याची मंगळवारपासून बारावीची परीक्षा देणार होता. मात्र आदल्या दिवशी त्याचा अपघात झाला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी हलविले. मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने परीक्षा देण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गौरव हा देखील कुटुंबात एकुलता एक आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात मयताचा पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची माहिती घेवून फुटेज तपासले जाईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !