ललवाणी अॅग्रो टुरिझममध्ये पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंटची नवी पर्वणी !
डीवायएसपी केदार बारबोले, अॅड.सुनील चोरडिया यांच्याहस्ते सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे लोकार्पण
भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : येथून जवळच असलेल्या कुर्हेपानाचे येथील ललवाणी अॅग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे लोकार्पण भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले व नुकतेच सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोजक, गृह विभाग या पदावर पदोन्नती झालेले अॅड.सुनील चोरडिया यांच्याहस्ते करण्यात आले.
सुखद अनुभूती
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी ललवाणी अॅग्रो टुरिझमच्या निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करीत येथे आल्यानंतर आपला सर्व ताणतणाव दूर होऊन सुखद अनुभूती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जल, जमीन आणि जंगल यांचा सुंदर मेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. पर्यटकांसाठी हे ठिकाण शांत, सुखद आणि समाधान देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अॅड. सुनील चोरडिया यांची सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोजक, गृह विभाग या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल मनजीया रेस्टॉरंटमध्ये अभिनंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. लेक व्ह्यू आणि निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमात चोरडिया यांनी ललवाणी परिवाराने मेहनतीने उभारलेल्या या निसर्गरम्य परिसराचे कौतुक केले. पर्यटकांनी दैनंदिन धावपळ व ताणतणाव विसरून निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद घ्यावा, या उद्देशाने ललवाणी अॅग्रो टुरिझमची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येथे खास खानदेशी पद्धतीचे रुचकर भोजन तसेच आरामदायी निवासाची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा..डी.एम.ललवाणी यांनी केदार बारबोले व अॅड.सुनील चोरडिया यांचा शाल, पुष्पगुच्छ, गोमातेची मूर्ती आणि ‘घरट्यातून आकाशाकडे’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर व यावल येथील अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील तसेच विशेष सरकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड.मोहन देशपांडे, राजीव तडवी, भूषण भामरे, रवींद्र रोकडे, कृतिका भट, कल्पेश देशमुख आदींनी सहकार्य केले.



