अमळनेरात दोघांकडून 11 लाखांचा गांजा जप्त : एमपीसह शिरपूरातील संशयीताला बेड्या
अमळनेर (30 मार्च 2025) : अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर छापा टाकून 56 किलो 970 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली. वाहनासह एकूण 11 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका पांढर्या बोलेरो पिकअप (एम.एच.18 ए.जे.0223) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

28 मार्च रोजी रात्री 10.50 वाजता पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ गाडी अडवली. गाडीच्या झडतीत 18 पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा सापडला. एकूण 56 किलो 970 ग्रॅम वजन असलेल्या गांजाची किंमत 11.39 लाख रुपये इतकी आहे.
याप्रकरणी मनोज सोनू पावरा (24, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (वय 52, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. तसेच, गांजा आणि 8 लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी असा एकूण 19.39 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दोघांविरोधात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत




