जळगावात रिक्षा चालकाकडे आढळला देशी कट्टा
जळगाव (30 मार्च 2025) : जळगाव शहरातील शनी पेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नेरी नाका येथील परिसरात एका रिक्षा चालकाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात गस्त आणि नाकाबंदी वाढवली असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी शहरात कडक बंदोबस्त राखण्याच्या सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगावकडे येणार्या एका रिक्षाचालकाकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, शुक्रवार, 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी नेरी नाका येथे सापळा रचला. काही वेळाने संशयित एम.एच.19 सी.डब्ल्यू.6108 क्रमांकाच्या रिक्षास अडवून तपासणी केली असता चालक राहुल रंगराव पाटील (32, रा. कुसुंबा, गणपतीनगर, जळगाव) याच्याकडे लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे आणि रविंद्र साबळे यांनी केली.




