बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण : काय आहे नेमके प्रकरण
बीड (31 मार्च 2025) : राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील संशयीत वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले यांच्यावर बीड जिल्हा कारागृहात हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळब्ळ उडाली. या प्रकरणानंतर महादेव गीतेसह त्याच्या चार साथीदारांना बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आले मात्र कराड आणि घुलेला नाही, तर आम्हाला मारहाण झाल्याचा दावा महादेव गीो याने केल्यानंतर या प्रकरणातील ट्वीस्ट वाढला आहे.
महादेव गित्ते, मुकुंद गित्ते, राजेश नेहरकर यांसह आणखी एकाची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. तत्पूर्वी पोलिस वाहनात बसत असताना महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधत वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली, असा दावा केला. तसेच मारहाण करून आम्हालाच संभाजीनगरला पाठवले जात आहे, असेही तो म्हणाला. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, यामागची खरी परिस्थिती समोर येईल, असेही महादेव गित्ते म्हणाला.

वाल्मीक कराडला मारहाण !
वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीड कारागृहात बंदिस्त आहेत. सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कैद्यांना नाष्टा दिला जात होता. त्यावेळी वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेवर हल्ला झाला. याच कारागृहात शिक्षा भोगणार्या महादेव गीते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्यांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी वाल्मीक कराडला 3-4 थापडा मारण्यात आल्याची माहिती आहे.
महादेव उद्धव गित्ते (34) हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी बबन गित्ते यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. 29 जून 2024 दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 च्या सुमारास महादेव गित्ते याच्या घरावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात हल्ला करण्यासाठी आलेला बापू आंधळे ठार झाला होता. हा हल्ला वाल्मीक कराडच्या इशार्यानुसार झाल्याचा त्याचा दावा आहे.




