आजोबांसोबत शेतात गेल्यानंतर अचानक वीज कोसळल्याने अल्पवयीनाचा मृत्यू : धानवडमध्ये हळहळ


जळगाव (1 एप्रिल 2025) : शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय नातवाच्या अंगावर वीज पडताच त्याचा मृत्यू झाला तर आजोबा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये घडली.

अंकुश विलास राठोड (15, रा. धानवड, ता. जळगाव) असे मयताचे तर शिवाजी जगराम राठोड (65) असं जखमी आजोबाचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.


अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.

या घटनेनंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !