रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रौढाकडील 25 हजारांची चोरी : चालकासह साथीदारांना एमआयडीसी पोलिसांकडून बेड्या


जळगाव (1 एप्रिल 2025) : रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रौढाकडील 25 हजार रुपये लांबवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा चालक आणि त्याचा साथीदारास अटक केली.

काय घडले जळगावात ?
फिरोज शेख शादुल्ला (50, रा.नांदुरा, जि.बुलढाणा) हे अजिंठा चौफुली येथून नांदुरा येथे जाण्यासाठी थांबले होते. त्यांच्याजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत 25 हजार रुपये रोख होते. यावेळी ऑटो चालकाने आम्ही खामगाव जात असल्याचे सांगत तुम्हाला कुठे जायचे असे विचारून त्यांना रिक्षात बसविले. रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी फिर्यादी फिरोज शेख यांना सांगितले की, आम्हाला सीटवर व्यवस्थित बसता येत नाही. तुम्ही रिक्षातून खाली उतरा व दुसर्‍या वाहनात जा त्यामुळे फिर्यादी हे खाली उतरून त्यांच्याकडे असलेली प्लास्टिकची पिशवी पाहत असताना त्याला कट मारलेला दिसला व त्यात पैसे दिसून आले नाही. फिर्यादी फिरोज शेख यांनी लगेच रिक्षा थांबवण्यासाठी आवाज दिला. पण रिक्षा न थांबता निघून गेली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


सीसीटीव्हीमुळे गुन्हा उघडकीस
नेत्रम प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास केला. त्यात एक संशयित रिक्षा मिळून आली. त्यामध्ये रिक्षा चालक वसीम कय्युम खाटीक (रा.मास्टर कॉलनी) याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार तौसिफ़ खान सत्तार खान (रा.रामनगर, मेहरूण) व एक अल्पवयीन मुलगा अशांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तौसिफ़ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती काढून त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

गुन्ह्यातील फिर्यादी यांची चोरलेली 25 हजार रुपये रक्कम आणि रिक्षा क्रमांक (एम.एच.19 सी.डब्ल्यू.5250) जप्त करण्यात आली .

यांनी उघडकीस आणला गुन्हा
एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गीते, गणेश ठाकरे आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !