वडगाव लांबे उपसरपंच अपघातात ठार
Vadgaon Lambe Sub-Sarpanch killed in accident चाळीसगाव (2 एप्रिल 2025) : अज्ञात वाहनाच्या धडकेत भाजपच्या उपसरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 1 एप्रिल रोजी रात्री चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात घडला. प्रकाश निळकंठ पाटील (45) असे मृताचे नाव असून ते वडगाव लांबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच होत.
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
प्रकाश पाटील आपल्या दुचाकीने प्रवास करीत असताना चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली. मंगळवार, 1 एप्रिल रोजी रात्री उशिरा उपसरपंच प्रकाश पाटील यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





