चौफेर टीकेची झोड उठताच मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त डॉ.सुश्रृत घैसासांचा राजीनामा
पुणे (7 एप्रिल 2025) : दहा लाखांचे डिपॉझिट न भरल्याने पुण्यात विवाहितेला प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठल्यानंतर आंदोलन करण्यात आले होते. तनिषा भिसे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडलेले या रुग्णालयाचे वादग्रस्त डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. यासंबंधीच्या रिसिप्टवर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली. या प्रकरणी सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी दीनानाथ रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर सरकारनेही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. या समितीचा सोमवारी अहवाल आला. त्यानंतर काही तासांतच डॉक्टर घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.

रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य : डॉ.घैसास
डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयातील अत्यंत अनुभवी व कुशल डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या विरोधात झालेले आरोप तथा त्यानंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण-तणाव आणि रुग्णालयाच्या प्रतिमेला झालेली हानी लक्षात घेता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले.
ते आपल्या राजीनामा पत्रात म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत आहे. विशेषतः माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका आहे.
