शिर्डीत पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकर्यांचा मृत्यू
Four beggars caught in Shirdi die अहिल्यानगर/शिर्डी (8 एप्रिल 2025) : अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकर्यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिक्षेकर्यांना ताब्यात घेतले मात्र काहींना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आलं होतं. त्यातील 10 भिक्षेकर्यांची तब्येत बिघडताच त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशोक बोरसे, सारंधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, ईसार शेख अशी मृतांची नावं आहेत.
भिक्षेकर्यांना बांधून ठेवल्याचा आरोप
मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या भिक्षेकर्यांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. त्या रूमला टाळं ठोकण्यात आलं होतं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रुग्णांना साधं पाणीदेखील देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

रुग्णांना दारुचं व्यसन असल्यानं ते उपचारांवेळी त्रास देत होते त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं, असा दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केला आहे.
भिक्षेकर्यांवर कोणते उपचार झाले, कोणाच्या हलगर्जीपणा 4 जणांचा जीव गेला, याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयानं केवळ दोन भिक्षेकर्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.




