हॉट सिटी भुसावळचा पारा 45.8 अंशावर
राजस्थानसह गुजरातकडील उष्ण-कोरड्या वार्यांचा परिणाम
The mercury in hot city Bhusawal reaches 45.8 degrees भुसावळ (9 एप्रिल 2025) : राज्यातील सर्वाधिक हॉट सिटी असलेल्या भुसावळ शहरात तापमानाचा पारा तब्बल 45.8 अंशावर पोहोचला आहे. वायव्य भारत, गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमधील उष्णतेच्या लाटेच्या परिणामामुळे भुसावळ शहर व विभागातील तापमान उच्चांकी पातळीवर आहे. मंगळवारी शहराचा तापमाने 45.8 अंश तापमान केंद्रीय जल आयोगाने नोंदवले.
दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट
उच्चांकी तापमानामुळे शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, उद्यानांमध्ये निरव शांतता होती. तापमानामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर डांबर सुद्धा वितळून वर आले. जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाणे परिसर, यावल रोडवरील साईजिवन सुपर शॉपी परिसर, एन. के. नारखडे शाळेच्या परिसरातील शारदा नगर चौक, आयसीटी कॉम्प्युटर जवळील चौक, टेक्निकल हायस्कूल परिसरात हे चित्र होते.

कमाल तापमान वाढीची कारणे काय?
सध्या वार्याची दिशा उत्तर पश्चिमेकडून आहे. राजस्थानातील वायव्य भारतातील वाळवंटी प्रदेश, मध्य प्रदेशातील मालवा व गुजरातमधील कच्छच्या वाळवंटातून येणार्या उष्ण व कोरड्या हवेमुळे तापमान वाढले आहे.
आगामी काळातही उष्णतासदृश लाट कायम राहील. पण तिची तीव्रता काहीशी कमी होईल. 9 ते 14 एप्रिलदरम्यान तापमान सरासरी दोन अंशांनी कमी होऊ शकतो. पण, 15 नंतर त्यात पुन्हा वाढ होईल, असादेखील अंदाज आहे.






