अल्पवयीनाची बलात्कार करून हत्या करणार्या आरोपीचा कारागृहात गळफास
Accused of raping and murdering a minor hangs himself in jail तळोजा (13 एप्रिल 2025) : तळोजा कारागृहात कैदी असलेल्या विशाल गवळी याने कारागृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. संशयीत गवळी याने कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे 13 किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता. तसेच तो शेगाव येथे जाऊन लपला होता.

या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी 22 डिसेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेरीस दुसर्यादिवशी घरापासून सुमारे 13 किमी अंतरावर या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची सहा पथके सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत होती. ज्या परिसरात मुलगी राहत होती तेथील सीसीटीव्हीमध्ये ती परिसराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला. यादरम्यान एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. ज्या घराबाहेर हे बूट होते ते घर विशाल गवळीचे असल्याचे समोर आले होते.




