बदलत्या ऋतुमानानुसार आहार-विहारासह दिनचर्येत बदल करणे गरजेचे : डॉ. पूर्वा ठाकूर
भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : आयुर्वेदानुसार शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यांच्यामधील काळ हा ऋतुसंधीचा असतो. या काळात वातावरणातील बदलांचा शरीरावर परिणाम होत असल्याने आहार, विहार आणि दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक असल्याचे विचार प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.पूर्वा ठाकूर यांनी येथे व्यक्त केले. शहरातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित साप्ताहिक व्याख्यानमालेंतर्गत ‘बदलत्या ऋतूनुसार आहार-विहार, आरोग्याची काळजी आणि आयुर्वेदिक दिनचर्या’ या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.पूर्वा ठाकूर यांचे व्याख्यान सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता नवशक्ती प्रांगणात झाले. यावेळी डॉ.ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
प्रवचनाचे वाचन
कार्यक्रमाची सुरुवात श्री अष्टभुजा मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. डॉ.पूर्वा ठाकूर आणि संघाच्या अध्यक्षा अलका ढाके यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. ज्ञानेश्वर गव्हाळे यांनी रामनाम जप घेतला तर भारती जंगले यांनी विश्वकल्याण प्रार्थना व परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे वाचन केले. डॉ.पूर्वा ठाकूर यांचा परिचय रत्नाकर शिरसागर यांनी करून दिला.






शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा
डॉ.पूर्वा ठाकूर यांनी अभ्यंगस्नानाचे महत्त्व सांगताना त्वचेचे आरोग्य, शरीरातील वातदोषाचे संतुलन आणि स्नायूंना मिळणारा आराम यासाठी तेलाने अभ्यंग करण्याचे महत्त्व विषद केले. कोमट तेलाने डोक्याची व शरीराची योग्य पद्धतीने मालिश करावी. विशेषतः पायांना तेल लावून मालिश केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते मात्र अजीर्ण, ताप किंवा काही विशिष्ट शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी अभ्यंग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. उटण्याचे प्रकार, त्यांचा उपयोग आणि त्वचेच्या प्रकृतीनुसार त्यांची निवड याविषयीही त्यांनी माहिती दिली.
दिवाळीतील वसुबारस, धनत्रयोदशी यांसारख्या सणांचे सांस्कृतिक व आरोग्यविषयक महत्त्व त्यांनी उलगडून सांगितले. वसुबारसच्या दिवशी गोमातेचे पूजन करून निसर्ग आणि प्राणिमात्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. धनत्रयोदशीला धने व गूळ खाण्यामागील आयुर्वेदिक दृष्टिकोनही त्यांनी स्पष्ट केला.
डॉ.पूर्वा ठाकूर मार्गदर्शनात म्हणाल्या की, आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन आहे. प्रत्येक ऋतूचा मानवी शरीर, मन आणि पचनशक्तीवर वेगवेगळा परिणाम होत असतो. हेमंत ऋतूत पचनशक्ती तुलनेने चांगली असते. त्यामुळे प्रकृतीनुसार पौष्टिक व स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. कोमट पाणी प्यावे, ज्यूसपेक्षा शक्यतो ताजी फळे खावीत. दूध पचण्यास जड वाटत असल्यास मर्यादित प्रमाणात घ्यावे. त्यात हळद, सुंठ किंवा ज्येष्ठमध घालण्याचे फायदेही त्यांनी सांगितले.
शरीरासोबत मनालाही शांतता
वृद्धावस्थेत शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायाम करणे, कोवळ्या उन्हात काही वेळ बसणे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे, पुरेशी झोप घेणे आणि तहानेनुसार पाणी पिणे या साध्या पण महत्त्वपूर्ण सवयी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. योगासने, प्राणायाम, ज्ञानवाचन व ध्यानधारणा यामुळे शरीरासोबत मनालाही शांतता आणि प्रसन्नता मिळते. केवळ बाह्य आरोग्य नव्हे, तर अंतर्मनाचे आरोग्य जपणेही तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
अलका ढाके यांनी डॉ.पूर्वा ठाकूर यांनी अत्यंत सोप्या, सुबोध आणि उपयुक्त पद्धतीने आयुर्वेदातील तत्त्वे दैनंदिन जीवनाशी जोडून समजावून सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव गजानन सेवलकर यांनी केले. छायाचित्र गजानन दादा ठाकूर यांनी घेतले. आभार दर्शन संघाचे कोषाध्यक्ष अशोक निकम मानले. कार्यक्रमाची सांगता विकास टोपरे यांनी केली. गव्हाळे, भामरे, बेंडाळे दादा यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व इतर सभासद सहकार्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य लाभले.