यावल शहरात हरिता-सरीता नद्यांच्या संगमावर बालाजी महाराजांचा ओढला रथ
चोपडा रस्त्यावर खंडोबा महाराजांच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या
Twelve chariots pulled in Yaval city to the tune of Shri Balaji Maharaj’s chants यावल (13 एप्रिल 2025) : सुमारे 119 वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील श्री बालाजी महाराजांचा रथोत्सवाच्या मिरवणुकीस शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता सुरवात झाली. शहरातील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्या लगतच्या हरीता-सरीता नद्यांच्या संगम पात्रातून पारंपरीक पध्दतीने पूजा-अर्चा करीत भाविक-भक्तांनी रथ ओढला. साडेसात वाजेला हा रथ महाराणा प्रताप नगराजवळ दाखल झाला तत्पूर्वी चोपडा रस्त्यावरून खंडेराव महाराजांच्या बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविक-भक्तांची उपस्थिती होती पहाटे या रथोत्सवाची सांगता होणार आहे.
रथोत्सवाला 119 वर्षांची परपंरा
यावल शहरातील रथोत्सवाला 119 वर्षांपूर्वीची परंपरा आहे. दरवर्षी श्री हनुमान जयंतीनिमित्ताने शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्याशी हरीता-सरीता नदीत यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी शनिवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात रथ पूजन कार्यक्रम मंदार देशमुख यांनी सपत्नीक पार पडला व रथ ओढण्यास सुरवात झाली. रथात रमेश शास्त्री बयाणी, महेश बयाणी, राजेश बयाणी, अर्थव बयाणी व सुनील जोशी महाराज यांची उपस्थिती होती.

रथाचे उत्स्फूर्त स्वागत
शहरातून रथ मार्गस्थ होतांना पूजा-अर्चा व नारळांचा स्वीकार भटजी मंडळींकडून करण्यात आला. भालदार व चोपदार म्हणून रात्रभर रथ सेवेकरीता शिवाजी चौधरी, विलास कोलते, सुरेश चौधरी आणि तोताराम चौधरी हे विशेष वेशभूषेत तैनात होते. या रथाचे शहरातील महाराणा प्रताप नगरात आगमन झाल्यावर रथाचे स्वागत विविध सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य यांनी केले. या रथोत्सवात फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पाराजी वाघमोळेसह सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
वहनांनी वेधले लक्ष
श्री बालाजी महाराज यांच्या रथोत्सवातील विशेष आर्कषण म्हणजे डोक्यावर तब्बल आठ किलो वजनाचे मोरपंख असलेले मुकूट लावून तालबध्द पध्दतीने पारपांरीक वाद्यावर नृत्य करणारे वहन. जळगाव येथील वहन परंपरा जोपासणारे कलावंत सचिन सोनार, साई धनगर, योगेश झाल्टे, जितेंद्र कोळी, विजय शिरसाट या तरूणांनी लक्ष वेधले होते.
बारागाड्या उत्साहात ओढल्या
चोपडा रस्त्यावर बडगुजर समाजाच्या वतीने खंडोबा महाराजाच्या यात्रेचे आयोजन केले जाते. महाराणा प्रताप नगरात खंडोबा महाराजाच्या मंदिरात भंडारा उधळत बारागाड्या ओढण्यात आल्या. चोपडा रस्त्यावरून मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील भगत ओम श्यामसिंग ठाकूर यांनी उत्साहात बारागाड्या ओढल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येत भाविक-भक्तांनी चोपडा रोडसह महाराणा प्रताप नगर, हडकाई नदी पात्रात प्रचंड गर्दी झाली.
