विवाहितेचा मृत्यू : ससून रुग्णालयाची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
पुणे (17 एप्रिल 2025) : वेळीच उपचार न मिळाल्याने पुण्यात सौ.तनिषा भिसे या विवाहितेचा मृत्यू ओढवला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ.घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नसल्याने रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला असून सहा पानांचा हा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला.
या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीकडून स्पष्ट भूमिका घेतली गेली असून, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे म्हटल्याचे समजते.

तत्पूर्वी, या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर उपचार प्रक्रियेतील त्रृटी व संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. पोलीस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती.
या घटनेनंतर भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. भविष्यात अशी दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमचा रोष केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण ढिसाळ व्यवस्थेवर आहे, असे स्पष्ट मत कुटुंबीयांनी मांडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास व निर्णय ससून रुग्णालयाच्या अंतिम अभिप्रायानंतर घेतला जाणार आहे.
