अंजली दमानियांचा दावा ; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होताच अजित पवारांचा राजीनामा


पुणे (4 डिसेंबर 2025) : एफआयआरमध्ये अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट झालेच पाहिजे. एकदा का पार्थ यांचे नाव गुन्ह्यात आले की अजित पवार यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करीत या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी केली आहे. दमानिया यांनी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शीतलला अटक हा तर देखावा
अंजली दमानिया म्हणाल्या, सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि राजकारण्यांसाठी कायदा वेगळा झाला आहे, हीच महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शीतल तेजवानीला पुण्यातील महार वतनाच्या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात झालेली अटक फक्त दिखावा असून पार्थ पवारचे नाव सुद्धा एफआयआरमध्ये नाही. सरकारी जमीन 1800 कोटींची खाऊनही त्याला अटक होत नाही.



इतर विरोधी पक्षांची भूमिका काय ?
अंजली दमानिया यांनी केवळ सत्ताधार्‍यांवरच नव्हे, तर विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पार्थ पवार यांच्या एफआयआरसाठी विरोधी पक्षांनीही आक्रमक मागणी करणे गरजेचे होते. काँग्रेस हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे समजते, मात्र इतर विरोधी पक्ष काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिग्विजय पाटील पळून गेले तर जबाबदार कोण?
आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू असतानाच दिग्विजय पाटील यांना जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. चौकशीला पुन्हा हजर राहण्याची ग्वाही सगळेच देतात. पण एकदा देश सोडून पळून गेल्यावर परत किती जण येतात? दिग्विजय पाटील परत आले तर ठीक, पण नाही आले तर काय? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय. त्यातील एक माणूस दाखवा, जो परत आलाय,” असे दमानिया म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
दमानिया म्हणाल्या की, मी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. जमीन खरेदी करणारी ‘अमेडिया’ ही कंपनी असून त्यात पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. असे असताना एफआयआरमध्ये केवळ एक टक्का भागीदारी असलेल्या आणि फक्त सहीचे अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव टाकून काय उपयोग? मुख्य भागीदाराचे नाव गुन्ह्यात आलेच पाहिजे, अशी मागणी त्या फडणवीसांकडे करणार आहेत.

नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे षडयंत्र
नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामच्या नावाखाली ती जमीन बळकावून तिथे मुंढव्यासारखे षडयंत्र केले जातंय, असे मला कळतंय. हे षडयंत्र गिरीश महाजन करत आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण समर्थन देत आहेत. जमिनी भूईसपाट करून बिल्डर आणि राजकारण्यांच्या घशात जात आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !