भ्रष्टाचाराची शंका असल्यास माजी आमदार चौधरींनी मोकाट कुत्र्यांचे टेंडर स्वीकारावे, आम्ही बक्षीसही देवू : भुसावळातील पत्रकार परिषदेत युवराज लोणारी


भुसावळ (2 जून 2026) : भुसावळातील मोकाट कुत्र्यांबाबत माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेली टीका ही अज्ञानातून केली आहे. काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची हे त्यातून स्पष्ट होते. वास्तविक मोकाट कुत्रे पकडण्यासाठी दीपनगर व वरणगाव फॅक्टर परीसरात 3500 रुपयांची निविदा असून पालिकेने प्रती कुत्र्यासाठी 1650 रुपये मंजूर केले आहेत. कुत्रे पकडताना भ्रष्टाचार होत असल्यास चौधरींनी ही निविदा स्वीकारावी व आम्ही त्यांना शंभर रुपये प्रति कुत्र्यामागे बक्षीस देवू, असा दावा भुसावळातील भाजपाचे गटनेता युवराज लोणारी यांनी केला. गुरुवारी मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कागदपत्रे नसल्यानेच नगराध्यक्षा अपात्र
माजी आमदार चौधरींनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर टीका करीत त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला होता शिवाय पकडण्यात आलेले कुत्रे पुन्हा सोडून त्यांना पुन्हा पकडून भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता व पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवकांवर टीकेची झोड उठवली होती. या आरोपांचा समाचार गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजपेयींनी घेतला.



युवराज लोणारी म्हणाले की, चौधरींच्या दृष्टीने मोकाट कुत्रे पकडण्यात भ्रष्टाचार होत असल्यास त्यांनी निविदा (टेंडर) घ्यावी व प्रति कुत्रा पकडल्यानंतर शंभर रुपये भाजपातर्फे बक्षीस आम्ही देवू. भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे या कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने अपात्र ठरल्या मात्र आता 14 वा 15 ला पुन्हा पालिकेत आम्ही सत्तेवर येवू, असे अधिकार्‍यांना फोन करून सांगितले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शहर विकासाच्या विषयांना घेवून काही दिवसांत सर्वसाधारण सभा होईल. असे त्यांनी स्पष्ट करीत चौधरींनी केलेल्या सहा कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे खंडण केले. संबंधित ठेकेदाराने येवून आम्हाला सांगितल्यास आम्ही भाजपाचे सर्व नगरसेवक राजीनामा देवू, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

सर्वसाधारण सभा लाईव्ह होणार
युवराज लोणारी म्हणाले, नियोजित सर्वसाधारण सभेची तारीख लवकरच निश्चित केली जाईल. या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण शहरवासीयांना दाखवण्यात येईल. सभेमध्ये सर्व विषयांवर खुली चर्चा होऊन नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील. विरोधकांनी फक्त टीका करण्यापेक्षा विकासकामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आता केवळ विकासाची कामे होणार : शैलजा नारखेडे
प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे म्हणाल्या, 12 मे रोजी आम्ही प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतला मात्र 18 मे ते 22 जून दरम्यान विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने आम्ही तातडीने कामाला लागलो आहोत. शहरातील अमृत योजनेच्या कामाचा व महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेचा आढावा घेऊन अधिकार्‍यांसोबत चर्चा केली आहे. कामाच्या नियोजनासाठी ठोस पावले उचलत आहोत.

10 दिवसांआड पुरवठा सुरू होणार
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी पाणीटंचाईबाबत खुलासा केला. तापी पात्रातील बंधार्‍यात पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी शहरात टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. आता बंधार्‍यात पाणीसाठा मुबलक झाला आहे त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत शहरातील नियमित रोस्टर म्हणजेच 10 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहा कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप खोटा असून जर आरोप सिद्ध झाला तर आम्ही राजीनामा देऊ, असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

पत्रकार परिषदेला भाजप पदाधिकार्‍यांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेला प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, नगरसेवक पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, विशाल नाटकर, प्राची पाटील, हेमराज भोळे, संतोष (दाढी) चौधरी, आशिष पटेल, संजय नाहटा, डॉ. प्रसाद बोंडे, निकी बत्रा, पुरुषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अजय नागराणी, सुजय इंगळे, अल्बर्ट तायडे, कैलास पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !