महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून यावलला स्ट्राँग रूम सुरक्षिततेचा आढावा
यावल (10 डिसेंबर 2025) : यावल तहसील कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मतदान यंत्रणेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी मंगळवार, 9 रोजी निवडणूक निर्णय अधिकार्यांची भेट घेतली. या भेटीत मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताची माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यात आली.
ईव्हीएम सुरक्षेचा आढावा
यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार छाया अतुल पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल वसंत पाटील यांनी त्यांच्या काही नगरसेवक पदाचे उमेदवार सहकार्यांसह येथील तहसील कार्यालयात स्ट्राँगरुम मधील मतपेट्यांच्या सुरक्षेविषयीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन यावल तहसील कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्यास असून स्ट्राँगरुम सील आहे. तेथील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही पाळत आणि पोलीस बंदोबस्त याबाबत उमेदवारांनी सविस्तर माहिती घेतली.









