पोलिस काय हजामती करतात का ? जयंत पाटलांच्या विधानानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंनी घेतला जोरदार आक्षेप


Do the police give haircuts? Textile Minister Sanjay Savkare strongly objected after Jayant Patil’s statement. नागपूर (14 डिसेंबर 2025) : नागपूर अधिवेशनाचे रविवारी सुप वाजत असून तत्पूर्वी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख करताना आरोपींना अटक न केल्याने ‘पोलिस काय हजामती करतात का’ असा शब्द प्रयोग केला व त्यांच्या या वाक्यावर भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. दोघा नेत्यांमध्ये बराच वेळ चाललेल्या वादानंतर अखेर तालिका अध्यक्षांनी हजामती हा शब्द रेकॉर्डवरून काढून टाकल्याचे घोषित केले.

काय घडले सभागृहात ?
राम खाडे या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला कोण करतंय? 15 दिवस झाले तरी एक माणूस सापडलेला नाही. मग पोलीस काय हजामती करतात की काय, मला आश्चर्य वाटते. संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि त्याचा कोणताच पुरावा लागत नाही, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.



यावेळी पोलिस काय हजामती करतात का? या त्यांच्या विधानावर मंत्री संजय सावकारे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर जयंत पाटलांचा पारा चढला. ते म्हणाले, माझी मराठी कमी आहे. तुम्ही मंत्री आहात पर्यायी शब्द सांगा म्हणत जयंत पाटलांनी सावकारेंना सुनावले. शब्द न हटवण्यावर जयंत पाटील ठाम राहिले.

आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे पदाधिकारी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थानांचे जमीन घोटाळे बाहेर काढले आहेत. मधल्या काळात त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले. सरकारने ते काढून घेतले. त्यांचा बंदुकीचा परवानाही नुतनीकरण करून दिला नाही.

पंधरा दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांच्यावर हल्ला झाला. मेला आहे म्हणून माणसांनी सोडला. दहा-बारा जणांनी एका वेळी हल्ला केला. जवळपास मेलेला होता. पण, कसा बसा तो वाचला. आता तो शुद्धीवर आला आहे. त्याचा एक पाय तुटला. एक हात तुटला. पंधरा दिवस झाले, तरी एक माणूस सापडला नाही, मग पोलिस काय हजामती करतात की काय, मला आश्चर्य वाटत आहे, असा संताप जयंत पाटलांनी पोलिसांच्या तपासावर व्यक्त केला.

मंत्री संजय सावकारेंचा जोरदार आक्षेप
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, ‘पोलिस काय हजामती करतात काय, असा शब्द वापरू नका.’ जयंत पाटील म्हणाले, ‘मग काय शब्द वापरू, तुम्ही पर्याय द्या ना. माझी मराठी कमी आहे.

सावकारे म्हणाले, ‘असे शब्द वापरू नका, प्लीज.’ जयंत पाटील म्हणाले,’ असेच शब्द वापरले पाहिजेत. दुसरं काय वापरणार?’ सावकारे म्हणाले, ‘तुम्ही चुकीचे शब्द वापरत आहात.’

सावकारेंनी आक्षेप घेतल्यानंतर जयंत पाटील त्यांना म्हणाले की, ‘हजामती म्हणजे काय, माहितीये का तुम्हाला? हजामतीचा अर्थ सांगा ना.’, सावकारे म्हणाले, ‘तुम्ही सांगा.’ त्यानंतर जयंत पाटील पुन्हा म्हणाले, ’तुम्हाला अर्थ कळत असेल, तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही.’ त्यावरून सावकारे म्हणाले,‘’तुम्ही पण होता ना मंत्री.’

जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘तुम्ही मला थांबवत आहात ना, मग मला हजामती शब्दाचा अर्थ सांगा.’ सावकारे अध्यक्षांना म्हणाले, ’हे शब्द काढून टाका.’

जयंत पाटील तालिका अध्यक्षांना म्हणाले की, अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द? तो असंसदीय नाही.

त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणाले, ’रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे.’ त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, ‘कुठले?’ अध्यक्ष म्हणाले, ‘हजामती.’ जयंत पाटील पुन्हा म्हणाले, ’कारण काय? सांगा ना? ते असंसदीय आहे का? विनाकारण… मी पोलिसांवर टीका करतोय, तुमच्यावर (सरकारवर) टीका करत नाही. तुम्ही कारण सांगा ना? तो शब्द असंसदीय आहे का? असंसदीय असेल, तर काढा. तपासा. असेल, तर काढा, नसेल, तर ठेवा.’ त्यानंतर हा वाद मिटला.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !