शेगावातील बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघाचा डंका : सहा पदकांसह चॅम्पियनशिप पटकावली
शेगाव (14 डिसेंबर 2025) : शेगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघाने अत्यंत उत्कृष्ट व दमदार कामगिरी करत चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पदकासह एकूण सहा पदके पटकावून चॅम्पियनशिप मिळवली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बॉक्सर्सनी सहभाग घेतला होता. मात्र जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ येथील खेळाडूंनी आपल्या मेहनतीचे, शिस्तीचे व कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत प्रत्येक लढतीत वर्चस्व सिद्ध केले.


पदक विजेते खेळाडू
जळगाव जिल्ह्यासाठी सुवर्णपदक जिंकणार्या खेळाडूंमध्ये नागेश खरारे, भावेश ठाकूर, आशुतोष गौतम आणि गौरव (बाहेर) यांचा समावेश आहे. पवन साळवे यांनी उत्कृष्ट खेळ करत रौप्यपदक पटकावले, तर जुबेर शेख यांनी कठीण स्पर्धेत कास्यपदक मिळवून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
संघभावना आणि कठोर सरावाचे फळ स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी घेतलेला कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मुळे हे यश मिळाल्याचे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वासाने खेळत प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक विजय मिळवला.
मान्यवरांकडून अभिनंदन
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे यांच्यासह विजय सोनवणे, प्रकाश जाधव, पवन शिरसाट आणि असलम शेख यांनी सर्व खेळाडू व जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे मनःपूर्वक अभिनंदन केले
जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख
या यशामुळे जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे राज्य क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम झाले असून, जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. येणार्या काळात जळगाव जिल्ह्याचे बॉक्सर राष्ट्रीय पातळीवरही नक्कीच ठसा उमटवतील, असा सर्व विजेता बॉक्सर यांनी विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







