नवोदय प्रवेश परीक्षा : भुसावळात 504 पैकी 49 विद्यार्थ्यांनी मारली दांडी
के. नारखेडे विद्यालय, ताप्ती पब्लिक स्कूल येथे परीक्षा ; गटशिक्षणाधिकार्यांची केंद्रांना भेट
Navodaya Entrance Exam : Out of 504 students in Bhusawal, 49 were absent भुसावळ : (14 डिसेंबर 2025) : सहावीच्या प्रवेशासाठी शासनाच्या नवोदय विद्यालयात प्रवेश देण्यात येणार्या परीक्षेसाठी शहरातील दोन केंद्रांवर शनिवारी परीक्षा पार पडली. एकूण 504 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती मात्र प्रत्यक्ष परीक्षेला 49 विद्यार्थी गैरहजर राहिले, तर 455 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पाचवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहावीतील प्रवेशासाठी ही परीक्षा अनिवार्य असल्याने शहरातील के. नारखेडे विद्यालय आणि ताप्ती पब्लिक स्कूल या दोन शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
गटशिक्षणाधिकार्यांची भेट
के. नारखेडे विद्यालयात 264 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी 31 विद्यार्थी गैरहजर राहिले तर 233 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये 240 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. येथे 18 विद्यार्थी गैरहजर राहिले असून 222 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.




दोन्ही परीक्षा केंद्रांना गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी भेट देत पाहणी केली. परीक्षा सुरळीत पार पडली असून दुपारी दोन वाजेपर्यंत परीक्षा प्रक्रिया सुरू होती. प्रशासनाच्या नियोजनामुळे परीक्षा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याची माहिती वायकोळे यांनी दिली.