शिंदी, मोंढाळे, खंडाळे परिसरात वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

पशू पालकांसह शेतकरी शेतमजुरांमध्ये भीती


Crops are being damaged by wild animals in the Shindi, Mondhale, and Khandale areas. भुसावळ (15 डिसेंबर 2025) : शिंदी, ता.भुसावळ परिसरातील खंडाळे, मोंढाळे, विचवा आदींसह परिसरात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला आहे. वनक्षेत्राला लागूनच हा भाग असल्याने वन्यप्राणी शेती शिवाराच्या दिशेने धाव घेत असल्याचे वेळोवेळी दिसून येत असते. शेती शिवारात हरीण, रानडुक्कर, नीलगाय (लोधडे) यांचा वावर वाढल्याचे दिसून येते. वन्य प्राण्यांच्या मागावर बिबट्यासारखे हिंस्र प्राणी येत असल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण आहे.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बिबट्याची दहशत
भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी, कंडारी, विल्हाळा या भागात बिबट्याचा वावर यापूर्वी आढळून आला आहे. शिंदीसह परिसरातील शिवारातही गतकाळात आनंदा वराडे यांचा एक गोर्‍हा, मारुती पाटील यांची गाय बिबट्याने फस्त केल्याचे समोर आले होते. मागील महिन्यात रानपट्टी भागात बिबट्याच्या डरकाळ्या व दर्शनाने शेतकरी शेतमजुरांची धांदल उडाली होती. या घटनांकडे वनविभागाने कानाडोळा न करता शेती शिवार व वनक्षेत्रात योग्य तो बंदोबस्त राखून वन समित्यांच्या माध्यमातून योग्य सूचना करणे आवश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहून गटागटाने शेती शिवारात संपर्कात राहून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतकर्‍यांच्या जीवितास धोका असल्याने वनविभागाने याबाबतीत शेतकरी शेतमजुरात जागृती करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या निलिमा गिरीश नेमाडे व शेतकर्‍यांनी केली आहे.





वनविभागाकडून मिळत नाही मदत
वन्य प्राण्यांमुळे शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाही वनविभागाकडून नुकसानीपोटी मदत मिळत नाही. मदतीचे निकष माहित नसल्याने शेतकरी पिकांचे होणारे नुकसान सहन करत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !