माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाणांसह वेतन अधीक्षक ईजाज तडवींच्या अडचणी वाढल्या : शिक्षण आयुक्तांचे चौकशीचे आदेश
अधिकार्यांच्या दलालांकडून लाखोंची अवैध वसुली : पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांचा आरोप
The troubles have increased for Secondary Education Officer Kalpana Chavan and Salary Superintendent Ejaz Tadvi: The Education Commissioner has ordered an inquiry. जळगाव (17 डिसेंबर 2025) : राज्यभरात गाजलेल्या गणवेश घोटाळ्यातील संशयीत तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण तसेच वेतन अधीक्षक ईजाज तडव यांच्यासह त्यांच्या हस्तकांमार्फत संस्थांची चौकशी लावून लाखोंची अवैध वसुली केली जात असल्याची तक्रार पाचोर्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करीत उभयंतांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर मंत्री भुसे यांनी संबंधित विभागाला चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
‘स्टे’ ऑर्डरद्वारे अधिकार्यांना त्याच जिल्ह्यात नियुक्ती कशी
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण तसेच वेतन अधीक्षक ईजाज तडवी यांना राज्यात गाजलेल्या गणवेश घोटाळ्यात निलंबित करण्यात आले मात्र या दोन्ही अधिकार्यांनी कोर्टातून ‘स्टे ऑर्डर’ घेऊन पुन्हा त्याच जिल्ह्यात त्याच पदावर काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे चव्हाण या शिक्षण संस्थांच्या खोट्या चौकशी लावतात तसेच शिक्षक व कर्मचार्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आर्थिक पिळवणूक करतात, असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला आहे.


भुसावळच्या विस्तार अधिकार्यांसह चौघांकडून अवैध वसुली
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दिलेल्या तक्रारीनुसार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या शिक्षण संस्थांवर खोट्या चौकशी लावतात, शिक्षक-कर्मचार्यांचे पगार थांबवतात आणि त्यांना मानसिक व आर्थिक छळ करतात. हे सर्व प्रकार करण्यासाठी त्यांच्या हाताखाली नामांकित दलाल कार्यरत आहेत. त्यात स्वप्निल पाटील (जळगाव), पंकज पाटील (पाचोरा), सतीश पाटील, कल्पना चव्हाण यांचे पती व भुसावळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धाडी यांचा समावेश आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
दोघा अधिकार्यांच्या निलंबनाची मागणी
आधीच गणवेश घोटाळ्यात निलंबित झालेल्या या अधिकार्यांना त्याच जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कार्यभार देणे धक्कादायक असून अनेक तक्रारी येऊनही कारवाई होत नाही. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा पत्रात आमदारांनी व्यक्त करीत कल्पना चव्हाण व ईजाज तडवी यांना निलंबित करणे किंवा अधिकार काढून पदावनत (डिमोशन) करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
कक्ष अधिकार्यांचे शिक्षण आयुक्तांना आदेश
मंत्री भुसे यांनी या संदर्भात तत्काळ चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाच्या कक्ष अधिकारी निशा महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना तक्रार अर्जाच्या अनुषंगाने यथोचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय वरदहस्त कुणाचा?
राज्यभर गाजलेल्या गणवेश घोटाळ्यात चव्हाणांना निलंबित व्हावे लागले व मात्र त्यांनी कोर्टातून स्टे ऑर्डर आणून जळगावात पुन्हा पदावर नियुक्ती मिळवली. ही नियुक्ती मिळवून देण्यामागे राजकीय वरदहस्त कुणाचा? असा प्रश्न आता उपस्थित होत असून आतातरी कारवाई होणार की नेहमीप्रमाणे कागदपत्रांचे खेळ चालून वेळ मारली जाणार ? असाही प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
अधिकार्यांकडून प्रतिसाद नाही
कल्पना चव्हाण यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.







