भुसावळात अनधिकृत विक्रेत्यांसह फुकट्या प्रवाशांवर कारवाई
Action taken against unauthorized vendors and fare-dodging passengers in BhusawaL भुसावळ (20 डिसेंबर 2025) : भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत दोन फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले असून 17 विनातिकीट प्रवाशांकडून आठ हजार 450 रूपये इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अनधिकृत विक्रीसाठी वापरल्या जाणार्या 7 ट्रॉली, 140 खोमचे (हातगाड्या) व 8 प्लास्टिक बादल्या असा साहित्यसाठा जप्त करण्यात आला. प्रवाशांची सुरक्षितता व स्थानकावरील शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
कारवाईने उडाली खळबळ
सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी.के.सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या पथकाने स्थानकाच्या विविध फलाटांवर तपासणी मोहीम राबविली. यावेळी अनधिकृतरीत्या विक्री करणारे फेरीवाले आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन फेरीवाल्यांना कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले.




फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईने खळबळ
जप्त केलेले सर्व साहित्य नियमांनुसार पार्सल कार्यालयात जमा करण्यात आले. दरम्यान, तिकीट तपासणीदरम्यान वैध तिकीट नसताना प्रवास करणार्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. रेल्वे नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंड वसूल करून त्यांना समज देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, रेल्वे कर्मचार्यांना सहकार्य करावे व नियमांचे पालन करावे व अशा तपासणी व कारवाया पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.