भुसावळातील ब्राह्मण संघात मनाच्या श्लोकांवर डॉ.सुषमा खानापूरकर यांचे व्याख्यान
भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : ब्राह्मण संघाच्या वतीने रामदास नवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या सिद्धहस्ते रचित मनाच्या श्लोकांवर आधारित प्रबोधन करणारे अभ्यासपुर्ण व्याख्यान डॉ.सुषमा खानापूरकर यांनी दिले. त्यांनी समर्थ्यांच्या मनाच्या श्लोकांचे आजच्या दैनंदिन मानवी व्यवहारत किती अनन्य साधारण महत्व आहे. हे उदाहरणं सहित विषद करीत श्रोत्यांची मने जिंकली.
तत्वज्ञानांचा प्रसार प्रचार व्हावा
प्रास्ताविकात अध्यक्ष गणेश वढवेकर म्हणाले की, आज दुर्दैवाने असो की गैरसमजामुळे असो समर्थ रामदास स्वामींवर आक्षेप घेणारे काही समाजबांधव दिसून येतात. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व दासबोध ग्रंथातील समाज व राष्ट्र उपयोगी तत्वज्ञानांचा प्रसार प्रचार करणे हाच एकमेव उपाय आहे व आपणा सर्वांचे धर्मकर्तव्य आहे.

डॉ.सुषमा खानापूरकर यांनी रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपल्या जीवनात कसे प्रत्ययास येतात याबाबत उद्बोधन करताना मनाच्या श्लोकांचे उदाहरण घेत असे सांगितले की,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।
जूी वंद्य ते सर्व भावे करावे।
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे॥
मनाला सज्जना असे संबोधून, चुचकारुन, गोंजारून भक्तिच्या वाटेने जायला सांगावे असे समर्थ सांगतात. असे केल्याने मनाचे सहकार्य मिळते. जगात निंदनीय गोष्टी सोडून द्याव्यात आणि चांगल्या, वैध, वंदनीय गोष्टी कराव्यात म्हणजे ताणतणाव आणि संघर्ष कमी होतो. भगवंताची कृपा प्राप्त होते.
नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे।
अती पाप बुद्धी न रे पाप साचे ॥
वाडवडिलांच्या संपत्तीवर नजर ठेवून, स्वार्थाने वागले, बंधुबांधवांबद्दल द्वेष बाळगला तर पापच पदरी येते. स्वकष्टाने धन मिळवावे.
जक्षी सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधोनि पाहे ॥
आपण देवाजवळ सुख मागतो पण स्वतः प्रभु रामांना सुद्धा आयुष्यात दुःख, वनवास, संघर्ष, प्रियजनांचा विरह सहन करावा लागला होता. रामाची भक्ती करायची म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा धैर्याने सामोरे जायला शिकायचे आहे.
नका करु खटपट। पहा माझा ग्रंथ नीट।
तेणे सायुज्याची वाट। गवसेल की॥
म्हणजे निव्वळ पारायण न करता माझ्या ग्रंथाचा नीट अभ्यास केला, चिंतन आणि आचरण केले तर सगळ्या दुःखांपासून सुटका मिळेल, असे समर्थांनी सांगितले आहे.
या नंतर मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. आरती व समर्थ परंपरे नुसार समाज बांधवांनी दिलेल्या डाळ तांदूळ व रोख आर्थिक सहकार्यरुपी भिक्षेतून कढी-खिचडीचे प्रसादभोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वहिंदू परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक दिलीपराव ओक, सुरेशराव कुलकर्णी व डी.एल.हिंदी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश जोशी, संगीत शिक्षक मुकेश खपली उपस्थित होते.
समाज बंधू-भगिनींनी उपस्थितीत राहून कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन सचिव महेंद्र गोडबोले यांनी केले. कोषाध्यक्ष आमोद टेेंभुर्णीकर, पंकज जोशी, जयंत जोशी, शंतनू गचके, प्रतीक बोचरे, श्रीमती कल्पना दामले, अशोक पाटील, विकी इंगळे, प्रज्ञा संत, सौ.सोहळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पंकज जोशी यांनी आभार मानले.






