आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
बालवारकर्यांची दिंडी, संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
जळगाव (रविवार, 26 जुलै 2026) : बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात बालवारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष वंदन वाणी, सचिव गोवर्धन पाटील, संचालक डॉ.विरल वाणी, बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, सौ. नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील, संतोष चौधरी, अवधूत दलाल, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व सौ.ज्योती बिर्हाडे उपस्थित होते. सुरुवातीला संतांच्या प्रतिमा व पालखी पूजन केल्यानंतर राजरत्न पारधे या विद्यार्थ्याने केलेले अभंग गायन आणि शाळेतील शिक्षिकांनी सादर केलेल्या अभंगाने भक्तीमय वातावरण निर्मिती झाली.
दिंडीने वेधले लक्ष
विवेकानंद नगर व परिसरातून बालवारकर्यांच्या दिंडीने परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी स्वागतासाठी रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले होते. ठिकठिकाणी दिंडी पूजन करण्यात आले. नागरिकांनी व पालकांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीचे शाळेत शेवटी आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत राजगिरा लाडू प्रसाद स्वरुपात देऊन दिंडी व उपक्रमाची सांगता झाली.
संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणींची बालकांना माहिती व्हावी व त्यांची महती त्यांच्यापर्यंत पोहचवी हेतूने बालरंगभूमी परिषदेतर्फे संत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्राथमिक गटातून निवांशी चव्हाण (सर्वोत्कृष्ट), स्वरा यशोद (उत्कृष्ट), पार्थ बोरसे (उत्तम) तसेच माध्यमिक गटातून हेमंत पाटील (सर्वोत्कृष्ट), दर्शना जगताप (उत्कृष्ट), भाग्यश्री पवार (उत्तम) यांनी पटकाविले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.नेहा पवार व सचिन महाजन यांनी काम पाहिले.
यानंतर विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक ही नाटिका सादर केली. उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिंनींच्या रिंगण पावली झाल्यानंतर शालेय संत व वारकरी वेशभूषेत मैदानावर गोलाकार रिंगणात पावली खेळत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी शालेय शिस्तीचे पालन करा व प्रत्येकाने उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्या, असा संदेश वंदन वाणी यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. योगेश शुक्ल व विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना बालरंगभूमी परिषदेच्या कार्य व उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. उपक्रमाचे नियोजन श्रीकांत पाटील व सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.



