राज्यावर अस्मानी संकट ! हवामान विभागाकडून या सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
Meteorological Department issues yellow alert for these seven districts मुंबई (23 फेब्रुवारी 2026) : भारतीय हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी राज्याच्या अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली तर विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. येथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि निफाड परिसरातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
रब्बी पिकांच्या नुकसानीची भीती
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे कोकणात सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल आहे.

विदर्भात पावसाचा हाहाकार ; नागपूर जलमय
नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. सोसाट्याच्या वार्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली.
भंडार्यात पहाटे पाच वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. याचा फटका चना, तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांसह फुलोर्यावर आलेल्या भाजीपाल्याला बसला आहे. मात्र, उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. येथेही बागायतदार शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकणात ‘हापूस’ संकटात
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची झोप उडवली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहोर आला असून काही ठिकाणी फळेही लागली आहेत. मात्र, वादळी वार्यामुळे मोहोर आणि कोवळी फळे गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.