रस्त्याच्या दुतर्फा कचर्‍याचे डोंगर ; शिरसोलीकडे जाणार्‍या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात !


Mountains of Garbage Line Both Sides of the Road ; Health of Travelers Heading Towards Shirsoli at Risk! जळगाव (24 मार्च 2026) : जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणार्‍या या रस्त्याच्या दुतर्फा कचर्‍याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सुंदर रस्ता भकास
मेहरुण तलावामुळे शिरसोली रस्ता निसर्गरम्य परिसर बनला. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. या रस्त्यावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि जैन हिल्ससारखी महत्वाच्या संस्था आहेत तसेच मंगल कार्यालयसुद्धा आहे. जैन हिल्सवर नेहमी असंख्य शेतकरी व इतर मान्यवरांची वर्दळ असते. पाचोरा, चाळीसगावसह नाशिक-पुणे शहराकडे जाण्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या काही भागात सामाजिक संघटनांनी वृक्षरोपण केले आहे. परंतु रस्त्यांच्या बाजूला टाकलेल्या कचर्‍यामुळे सुंदर रस्ता भकास होत आहे. जोरदार हवेमुळे उडून अनेकवेळा कचरा उडून रस्त्यावर येतो तसेच वाहन धारकांच्या डोळ्यातही जातो. त्यामुळे अपघातही होत असतात.


प्रशासनाचे मौन?
या रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’च्या घोषणा देणारे प्रशासन शिरसोली रस्त्याच्या या विद्रुपीकरणावर गप्प का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दंडात्मक कारवाईची भीती नसल्यामुळेच कचरा टाकणार्‍यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रस्त्याच्या कडेला साचलेल्या या कचर्‍यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयानक होण्याची शक्यता आहे. रस्ता सुंदर करण्याऐवजी तो भकास करणार्‍या या प्रवृत्तींना चाप लावणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !