भुसावळात संदल मिरवणुकीत राडा : चाकू हल्ल्यात दोन्ही गटातील चौघे जखमी
बाजारपेठ पोलिसात परस्परविरोधी गुन्हे : वाढत्या गुन्हेगारीने चिंता
Clash During Sandal Procession in Bhusawal : Four Injured from Both Factions in Knife Attack भुसावळ (25 मार्च 2026) : शहरातील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात डीजेचा दणदणाट सुरू असताना किरकोळ वादातून दोन गटातील तरुणांमध्ये जबर राडा सुरू झाला व हाणामारी सुरू असतानाच दोन्ही गटातील तरुणांकडून चाकूचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील चौघे तरुण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडल्यानंतर बाजारपेठ पोलिसात पहाटे परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे समाजमन चिंतीत झाले आहे.
हाणामारीत तरुण जखमी
पहिल्या गटातर्फे मंगळवार, 24 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घोडेपीर बाबा दर्गा परिसरातील मोकळ्या जागेत डीजे सुरू असताना काही तरुणांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला व हाणामारी सुरू असताना हातमजुरी करणारा अल्पेश मोहम्मद अशरफ शेख (18, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) हा तेथून जात असताना संशयीत अन्य समोरील तरुणांवर चाकूने वार करीत असताना हा वार अल्पेशच्या डाव्या पायाच्या मांडीत आरपार घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचार घेतल्यानंतर त्याने बुधवारी पहाटे 1.50 वाजता बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यावरून जावेद गट्टू गवळी (शिवपूर कन्हाळा, ता.भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जुबेर सिराज तडवी करत आहेत.

दुसर्या गटातील तिघे जखमी ; परस्परविरोधी गुन्हा
दुसर्या गटातर्फे शिवपूर कन्हाळा येथील 18 वर्षीय वसीम सलीम गवळी यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार, ते मित्रांसह संदलनिमित्त दर्ग्यात आल्यानंतर परतत असताना आक्रोश गवळीची कॉलर पकडून काही जणांनी वाद सुरू केला. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वसीम गवळीसह त्याच्या मित्रांवर बंटी उर्फ अल्फेश, मुजाहीद शेख, शाहीन शेख आणि फैजान शेख यांनी चाकूने तसेच दांडक्यांनी व लाथा-बुक्क्यांनी हल्ला चढवला. चाकू हल्ल्यात वसीम, रेहान गवळी व आफान गवळी जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आफान गवळीची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचा सुरू आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




