नवर्‍यासोबत सुखी संसार होण्यासाठी आलेल्या विवाहितेवर भोंदू अशोक खरातचा बलात्कार : नव्याने दोन गुन्हे दाखल


Fraudster Ashok Kharat Rapes Married Woman Who Had Sought His Help for a Happy Married Life: Two New Cases Registered नाशिक (28 मार्च 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणी सातत्याने वाढत असून आता त्याच्याविरोधात नव्याने दोन गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा, तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे.

अत्याचार करून भागवली कामवासना
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात खरातने पीडित महिलेवर आपल्या मोंडस ऑपरेंडीनुसार म्हणजे आपण दैवी अवतार असल्याचे सांगत अत्याचार केला. ही महिला आपल्या नवर्‍यासोबत संसार सुखाचा व्हावा म्हणून खरातकडे आली होती. पण त्याने तिच्यावरच अत्याचार करून आपला कामवासना भागवली.


संसारातील वितुष्ट थांबवण्यासाठी आल्यानंतर केला अत्याचार
प्रस्तुत प्रकरणात पती व पत्नीचे 2013 साली लग्न झाले. पण त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते त्यामुळे ते विभक्त राहत होते. एका व्यक्तीच्या सूचनेनुसार ते आपला संसारगाडा रुळावर आणण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेले होते. 2022 साली हे दोघे पहिल्यांदा त्याच्याकडे गेले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरात याच्याकडे गेले. त्यावेळी खरातने पतीला कॅबीनबाहेर बसवले. त्यानंर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच यावेळी त्याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली.

पीडितेला काय म्हणाला होता अशोक खरात?
तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी महादेवाचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझ्या मुलांना मारून टाकून तुझा संसार उद्ध्वस्त करेन असे खरात म्हणाला होता, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तत्पूर्वी, हे दोघे 2022 मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते, तेव्हा त्याने या दोघांना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली होती. त्यांनी लग्नाची तारीख सांगितल्यानंतर तुमचे लग्न चुकीच्या तारखेला झाल्यामुळे तुमच्यात सातत्याने वाद झाल्याची बतावणी त्याने केली होती. त्यानंतर हे दोघे जवळपास 6-7 वेळा त्याच्याकडे गेले होते.

कार्यालयात विवाहितेवर चार वेळा अत्याचार
ऑगस्ट 2024 मध्ये अशोक खरातच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात गेले असता त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने आपल्या तक्रारीत ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत अशोक खरातने आपल्यावर चार वेळा बळजबरीने गैरकृत्य केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक खरातविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल असून यातील दोन आर्थिक फसवणुकीचे तर आठ महिला अत्याचाराचे आहेत. राजेंद्र जासूद व राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत.

व्हिडिओ व्हायरल करणार्‍यांवर कारवाई
पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी नव्याने 65 जणांवर गुन्हे दाखल केल्याने या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा 74 वर गेला आहे. यापूर्वी कोपरगावातील तीन तर नाशिक पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अवघ्या तीन दिवसांत 74 जणांवर कारवाई करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !