गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह त्रिकूट एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव (28 मार्च 2026) : एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा शिवारातून तिघांना गावठी कट्टेकट्टा, जिवंत काडतुसे आणि एक महागडी दुचाकीसह पकडल्याने खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक ठकुबा गुंजाळ (28, रा.सिल्लोड), विठ्ठल रंगनाथ सोनवणे (25, रा.सिल्लोड) व अजय विरजू गांगुर्डे (रा.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव-संभाजीनगर रोडवरील एअरपोर्टच्या समोर असलेल्या नेस पार्कजवळ शनिवार, 28 मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना दुचाकीवरून तीन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता, आरोपींनी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याकडे विना परवाना बाळगलेला गावठी बनावटीचे कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. याशिवाय त्यांच्याकडून एक लाख रुपयांची पल्सर दुचाकी (क्रमांक एम.एच.20 डी.आर.2776) आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.




