भुसावळात अभियंत्यांचे घर फोडून सहा लाखांचा ऐवज लांबवला

वाढत्या चोर्‍यांनी घबराट : चोर्‍या रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान


Thieves break into engineer’s house in Bhusawal, make off with valuables worth ₹6 lakh. भुसावळ (31 मार्च 2026) : कुटूंब लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील जैन एरिगेशनमध्ये असलेल्या अभियंत्याचे घर फोडत सव्वा दोन लाखांची रोकड व 53 ग्रॅम सोन्यासह चांदीचे दागिणे मिळून एकूण सहा लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घरफोडीची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये वसीम शेख हे अभियंता म्हणून कार्यरत असून ते कुटूंबासह शहरातील फातेमा कॉलनीतील प्लॉट क्रमांक 43 मध्ये वास्तव्यास आहेत. 28 रोजी कुटूंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने संपूर्ण कुटूंब गावी गेल्याने घर बंद होते व ही संधी चोरट्यांनी साधली. शेख कुटूंब सोमवार, 30 रोजी मध्यरात्री दिड वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळला तर लोखंडी कपाटाचे लॉकर उघडे दिसल्याने खातरजमा केल्यानंतर त्यातील रोकडसह सोन्याचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. पहाटे बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी येवून पाहणी केली. तक्रारदार वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (फातेमा कॉलनी, न्यू बी.झेड.कॉलेजसमोर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


या ऐवजावर मारला डल्ला
8 ग्रॅम वजनाची व 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, नऊ ग्रॅम वजनाच्या व 45 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅम वजनाचे व 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम वजनाच्या व एक लाख रुपये किंमतीच्या अंगठ्या, सात ग्रॅम वजनाची 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाच्या व दहा हजार रुपये किंमतीच्या नाकातील फुल्या, चार ग्रॅम वजनाचे 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चांदीचे 20 ग्रॅम वजनाचे व 20 हजार रुपये किंमतीचे कॉईन, शंभर ग्रॅम वजनाचे व 15 हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायल व सव्वा दोन लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पाच लाख 95 हजारांचा ऐवज लांबवल्याचा गुन्हा दाखल असलातरी चोरीला गेलेल्या 53 ग्रॅम सोन्याचे मूल्य किमान आठ लाखांवर आहे. शहरातील वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !