नऊ हजारांची लाच मागणी भोवली : यावल वनविभागाचा वनरक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Demand for ₹9,000 Bribe Proves Costly : Yawal Forest Department Guard Caught in Jalgaon ACB’s Trap यावल (31 मार्च 2026) : वनविभागाच्या हद्दीतून लाकूड वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी नऊ हजारांची लाच मागणी करणार्या यावल वनविभागाच्या वनरक्षकाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (43, फॉरेस्ट क्वार्टर, यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराकडे दोन बोलेरो असून त्याद्वारे ते यावल परिसरातील लाकडाची अंजाळे, पाडळसे व भागात लाकडाची वाहतूक करतात. लाकडाची वाहतूक होवू देण्यासह कुठलीही कारवाई न करण्यासाठी गायकवाड यांनी 20 रोजी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागून नऊ हजारावर तडजोड केली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिली व लाच पडताळणी करण्यात आली मात्र लाच देण्याच्या वेळी आरोपी गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीच्या पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्याने व वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर सोमवार, 30 मार्च रोजी सायंकाळी गायकवाड यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात निरीक्षक रेश्मा अवतारे, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील आदींच्या पथकाने केली.
महागड्या मोबाईलसह रोकड जप्त
आरोपी गायकवाड यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक लाख 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, नऊ हजार 40 रुपयांची रोकड व अन्य एक हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.




