खेडीजवळ तिहेरी अपघातात भालगावातील फळ विक्रेता ठार


Fruit Vendor from Bhalgaon Killed in Triple Collision Near Khedi जळगाव (2 एप्रिल 2026) : जळगाव-भुसावळ महामार्गावर खेडी गावाजवळ बुधवारी दुपारी तिहेरी अपघातात भालगाव, ता.एरंडोल येथील तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्यानंतर मागून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीने पुन्हा जोरदार धडक दिल्याने समाधान बापू भोई (32, रा.भालगाव, ता.एरंडोल) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भालगाव परिसरात शोककळा पसरली.

अपघातात फळ विक्रेता ठार
समाधान भोई हे व्यवसायाने फळविक्रेते होते. बुधवार, 1 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असताना समोरून येणार्‍या एका मालवाहू रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे समाधान भोई रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी रिक्षाच्या पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या एका दुचाकीने त्यांना पुन्हा धडक दिली. या दुहेरी अपघातात समाधान गंभीर जखमी झाले.




पोलिसांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने समाधान यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर धडक देणारे वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान भोई यांच्या पश्चात पत्नी, मुले आहेत. तपास हवालदार गफूर तडवी करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !