एक्सपायर डेट बिस्कीटांसह कोल्ड्रींक्सची विक्री : त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात
दिल्ली (3 एप्रिल 2026) : मुदत संपलेली (एक्स्पायर्ड) बिस्किटं, खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा साठा अल्प दरात खरेदी करून संशयीत त्यावर नव्याने तारखा छापून या वस्तूंची विक्री करीत होते मात्र
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या रॅकेटचा पर्दाफाश करीत द्वारका येथील बामनौली गावात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
आरोपी बाजारातून मुदत संपलेले किंवा मुदत संपत आलेले पदार्थ अगदी कवडीमोल भावात खरेदी करत असत. त्यानंतर, ‘थिनर’ सारख्या रसायनाचा वापर करून पॅकेटवरील मूळ मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट अतिशय काळजीपूर्वक पुसून टाकत.


कोडिंग आणि प्रिंटिंग मशीन जप्त
क्राईम ब्रँचने घटनास्थळावरून एक विशेष कोडिंग आणि प्रिंटिंग मशीनही जप्त केली आहे, ज्याचा वापर पॅकेटवर नवीन आणि बनावट तारखा छापण्यासाठी केला जात होता. मुदत संपलेला खाण्यापिण्याचा माल नवीन तारीख लावून पुन्हा बाजारात विकला जात असे. मशीनच्या साहाय्याने नवीन बनावट तारीख छापल्यानंतर हे सामान नवीन पॅकिंगमध्ये भरून बाजारात पुरवलं जात होतं.
मोठ्या ब्रँडच्या कोल्ड ड्रिंक्सचे शेकडो कॅन जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून थम्स अप, स्प्राइट, लिम्का आणि कोका-कोला यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या कोल्ड ड्रिंक्सचे शेकडो कॅन आणि डबे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, पॅकेजिंग बदललेली नामांकित कंपन्यांची बिस्किटंही मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
तिघांना अटक
क्राईम ब्रँचच्या पथकाने घटनास्थळावरून कोल्ड ड्रिंक्सचे अनेक कार्टन्स आणि बिस्किटांचे पुडे जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. क्राईम ब्रँचने मुख्य सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. हे नेटवर्क नेमकं किती मोठं आहे आणि कोणत्या घाऊक व्यापार्यांच्या माध्यमातून हा माल बाजारात पोहोचवला जात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.






