भुसावळातील अभियंत्याकडील चोरी उघड : स्थानिक आरोपीला अटक
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Theft at Bhusawal Engineer’s Residence Solved: Local Accused Arrested भुसावळ (3 एप्रिल 2026) : शहरातील फातेमा कॉलनीतील रहिवासी व जळगावच्या जैन एरिगेशन कंपनीत अभियंता असलेल्या तरुणाकडे चोरट्यांनी संधी साधत बंद घरातून सव्वा दोन लाखांची रोकड व 53 ग्रॅम सोन्यासह चांदीचे दागिणे मिळून एकूण सहा लाखांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपास व स्थानिक खबर्यांच्या नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी स्थानिक आरोपीला अटक केली असून अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. अमीर खान हबीब खान (35, रा. न्यू ईदगाजजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बंद घराला केले टार्गेट
जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये वसीम शेख हे अभियंता म्हणून कार्यरत असून ते कुटूंबासह शहरातील फातेमा कॉलनीतील प्लॉट क्रमांक 43 मध्ये वास्तव्यास आहेत. 28 मार्च रोजी कुटूंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने संपूर्ण कुटूंब गावी गेल्याने घर बंद होते व ही संधी चोरट्यांनी साधली. शेख कुटूंब सोमवार, 30 रोजी मध्यरात्री दिड वाजता घरफोडीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सव्वा दोन लाखांची रोकड मिळून एकूण पाच लाख 70 हजरांचा ऐवज लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
पोलिसांनी घरफोडीनंतर तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही व खबर्यांचे नेटवर्क अॅक्टीवेट करीत आरोपी अमीर खान हबीब खान (35, रा.न्यू ईदगाजजवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चार लाख 99 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू सांगळे, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल अमर अढाळे, कॉन्स्टेबल दिलीप कोल्हे, कॉन्स्टेबल चंद्रकांत रायपूरकर, कॉन्स्टेबल अक्षय कोतकर, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल जीवन कापडे, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली.






