नागपूर हादरले : छेडछाडीला विरोध करणार्या पोलिस कर्मचार्याची निर्घृण हत्या
Nagpur Rocked : Police Constable Brutally Murdered for Resisting Harassment नागपूर (4 एप्रिल 2026) : नागपूरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्याच मुलीची छेड काढणार्या आरोपींना जाब विचारल्यानंतर पोलिस कर्मचार्यांची नराधम आरोपींनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पंकज ठाकूर असे मृत कर्मचार्याचे नाव असून ते एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. खून प्रकरणी आकाश मंडल आणि हर्षित मंडल या दोन भावांना पोलिसांनी अटक केली.
काय घडले नागपूरात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मंडल हा पंकज ठाकूर यांच्या 15 वर्षीय मुलीचा पाठलाग करत होता. मुलीने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर पंकज ठाकूर यांनी आकाशला मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला मात्र आकाशने आपले वर्तन सुरूच ठेवले.


गुरुवारी रात्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात आरोपी आणि मुलगी पुन्हा समोरासमोर आले. आकाश मुलीशी बोलताना पाहून पंकज ठाकूर संतापले आणि त्यांच्यात वाद झाला. ठाकूर यांनी मुलीला घरी पाठवले, पण यानंतर घटनेने हिंसक वळण घेतले.
कार्यक्रमानंतर घरी जात असताना शाळेजवळ आरोपींनी पंकज ठाकूर यांना पुन्हा गाठले. सुरुवातीला शाब्दिक वाद आणि नंतर हाणामारी झाली. ठाकूर आणि त्यांचे मेहुणे आरोपींवर भारी पडू लागले, तेव्हा हर्षित मंडलने चाकू काढून पंकज ठाकूर यांच्यावर सपासप वार केले. ते खाली कोसळताच आरोपींनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करत गंभीर जखमी केले.
आरोपी मृत झाल्याचे समजून घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी पंकज ठाकूर यांना मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मंडल बंधूंना अटक केली.





