धुळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : पाकिस्ताननिर्मित सौंदर्य प्रसाधनांची अवैध विक्री करणार्या विक्रेत्यांना अटक
61 हजारांचा कॉस्मेटीक सौंदर्य साधनांचा साठा जप्त ः अवैध विक्री करणारे विक्रेते रडारवर
Major Operation by Crime Branch in Dhule: Vendors Illegally Selling Pakistan-Made Cosmetics Arrested धुळे (4 एप्रिल 2026) : पाकिस्ताननिर्मित सौंदर्य प्रसाधनांची विक्री करण्यास भारतात बंदी असलीतरी शहरातील दोन विक्रेते मात्र सर्रास या साधनांची विक्री करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत दोघा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयीता विक्रेत्यांकडून सुमारे 61 हजारांचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईने अवैधरित्या सौंदर्यप्रसाधने विकणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. कैलास देवानंद नानकाणी व फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी अशी अटकेतील विक्रेत्यांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेला पाकिस्ताननिर्मित मात्र देशात प्रतिबंधीत सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवार, 3 रोजी दोन दुकांनावर छापेमारी करीत साठा जप्त केला. शहरातील जय शंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स या कैलास देवानंद नानकाणी (50, प्लॉट नं.3, अरुणकुमार वैद्यनगर, विद्या अपार्टमेन्ट, धुळे) यांच्या दुकानातून 30 हजार 63 रुपयांची सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली तसेच धुळ्यातील नॅशनल हायस्कूलमागीलसार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी (32, रा.सार्वजनिक मार्केट जवळ, पाकीजा कलेक्शन शेजारी, धुळे) यांच्या दुकानातून 31 हजार 400 रुपयांची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. दोन्ही दुकानातून एकूण 61 हजार 474 रुपये किंमतीची पाकिस्तान निर्मित व मानवी शरिरास घातक असलेली सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली.


पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांना बंदी मात्र धुळ्यात विक्री
भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग, मंत्रालय यांच्या अधिसूचना क्र.06/2025-2026 दि.02/05/2025 मध्ये परिछेद 2-20 ए नुसार पाकिस्तानातून आयातीवर बंदी घालण्यात आली असून प्रतिबंधित पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट्स विक्रीसाठी आणल्याने शासन व नागरिकांची फसवणूक केली शिवाय कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांची विक्री किंवा साठा करण्यासाठी विशिष्ठ परवान्याची आवश्यकता असते मात्र दोन्ही दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल अगर पावत्या वा परवाना न आढळल्याने त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात चाळीसगाव रोड व धुळे शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय नामदेव सहारे, उपनिरीक्षक चेतन मुंढे, उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, संदीप सा.पाटील, पवन गवळी, राहुल सानप, संतोष हिरे, चेतन बोरसे, देवेंद्र ठाकुर, आरीफ पठाण, राहुल गिरी, कमलेश सुर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.





