भुसावळात डायमंड पार्क परिसरात धाडसी घरफोडी : दोन लाख 10 हजारांचा ऐवज लंपास
भुसावळ (8 एप्रिल 2026) : शहरातील डायमंड पार्क परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून दोन लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मंगळवार, 7 एप्रिल रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला टार्गेट
शेख इस्ताक शेख मोहम्मद (40, रा. 32 खोली, डायमंड पार्कजवळ, भुसावळ) हे मजुरी काम करुन उदरनिर्वाह करतात. 31 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते वरणगाव येथे लग्न समारंभासाठी गेल्याने घर बंद होते तर लग्नाचा कार्यक्रम आटोपून 1 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच घरातील हॉल व बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त आढळला व बेडरूममधील लोखंडी कपाट व त्यातील तीन लॉकर उघडे दिसून आले. तपासणी केल्यानंतर कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीस गेल्याने बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवण्यात आली.

या ऐवजावर मारला डल्ला
चोरट्यांनी सहा ग्रॅम वजनाची व 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी. 20 भार वजनाचे व 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायातील कडे तसेच एक लाख 70 हजारांची रोकड मिळून दोन लाख 10 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. घरफोडीचा प्रकार 31 मार्च सायंकाळी 5 ते 1 एप्रिल दुपारी चार या कालावधीत घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख करीत आहेत.






