जळगावातून थेट तीन तासात करता येणार दिल्ली प्रवास ; इंदूरमार्गे दिल्लीसाठी विमानसेवा


Direct Travel from Jalgaon to Delhi Possible in Just Three Hours ; Air Service to Delhi via Indore जळगाव (25 एप्रिल 2026) : जळगाव विमानतळावरून आता देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीसाठी व्यावसायिक विमानसेवा सुरू होत आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या माध्यमातून इंदूरमार्गे नवी दिल्लीसाठी व्यावसायिक विमानसेवा येत्या 1 मे ते 31 मे या कालावधीत ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालवली जात आहे. याचे अधिकृत वेळापत्रक विमानतळ व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे. ही सेवा इंदूरमार्गे असल्याने जळगाव-इंदूर कनेक्टिव्हिटीलाही यामुळे बळकटी मिळणार आहे.

महिनाभर प्रायोगिक तत्वावर सेवा
जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 विमान कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून गोवा, पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. तसेच अलायन्स एअर विमान कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू आहे. जळगाव विमानतळावरून थेट दिल्लीपर्यंत नवीन विमानसेवा करण्याच्या दृष्टीनेही काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर त्याचा मुहूर्त निघाला आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या माध्यमातून 1 मे ते 31 मे दरम्यान ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

तीन तासात गाठता येणार दिल्ली
खरंतर रेल्वे किंवा रस्तेमार्गे दिल्ली गाठण्यासाठी जळगावकरांना 18 ते 24 तासांचा दीर्घ प्रवास करावा लागतो मात्र या नवीन विमानसेवेमुळे जळगाव ते दिल्ली हे अंतर आता अवघ्या तीन तास 10 मिनिटांत कापले जाणार आहे. अशाच प्रकारे जळगावहून थेट इंदूरसाठी रेल्वे सुविधा नसल्याने रस्ते मार्गे इंदूर जाण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. मात्र आता विमानाने केवळ 40 मिनिटांत इंदूर पोहोचता येणार आहे.

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण
ही नवीन विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असेल. दिल्लीहून दुपारी 04.50 वाजता विमान उड्डाण घेईल आणि 06.50 वाजता इंदूर येथे पोहोचणार आहे. तेथून रात्री 07.15 वाजता ते उड्डाण घेईल आणि रात्री 19.55 जळगाव येथे पोहचेल.

अशाच प्रकारे, आठवड्याचे तिन्ही दिवस जळगावहून रात्री 08.20 वाजता विमान उड्डाण घेईल आणि 09.00 वाजता इंदूर येथे पोहचेल. तेथून रात्री 09.25 वाजता ते उड्डाण घेईल आणि 11.30 वाजता दिल्लीत पोहचेल. यामुळे जळगाव-दिल्लीसोबतच जळगाव-इंदूर कनेक्टिव्हिटीलाही मोठी चालना मिळणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !