सोशल मिडीयावर मंत्री सावकारेंसह विविध समाजाची बदनामी : भुसावळातील माजी नगरसेवक मुकेश गुंजाळविरोधात गुन्हा


गणेश वाघ
Defamation of Minister Savkare and Various Communities on Social Media: Case Registered Against Former Bhusawal Corporator Mukesh Gunjal भुसावळ (27 एप्रिल 2026) : भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर सत्ताधार्‍यांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच शहराचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ (गुंजाळ कॉलनी, भुसावळ) यांनी सोशल मिडीयावरील फेसबुक पेजवर मंत्री संजय सावकारे तसेच लेवा पाटील, मराठा व अनुसूचित समाजाविषयी अवमानजनक व बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
भुसावळ बाजारपेठ पोलिसात नितीन जगन्नाथ नंदवने (42, जामनेर रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी सोशल मीडियावरील पवन नाले, जितेंद्र सुरेश नेहते नावाच्या फेसबुक पेजवर जाणीवपूर्वक लेवा पाटील समाज, मराठा समाज व आमच्या समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद व खालच्या स्तरावरील द्वेषपूर्ण भाषा वापरली तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दलदेखील अवमानजनक शब्द वापरून अशोभनीय वर्तन केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी समाजाला हिणवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुरनं.195/2026 भारतीय न्याय संहिता कलम 196, 299 व 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.

तेढ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करणार : पोलीस उपअधीक्षक
शहरातील सोशल मिडीयावरील प्रत्येक प्लॅटफार्मवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. कुणीही कोणत्या जाती, धर्माबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी दिला आहे. सोशल मिडीयावरील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपची सेंटींग अ‍ॅडमिन केल्यास अनावश्यक वादही टळणार आहेत. नागरिकांनी शहराची शांतता अबाधीत ठेवावी, असे आवाहनही बारबोले यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !